जामखेड प्रतिनिधि अमृत कारंडे:
सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त माहिजळगाव येथे उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात आला.
सध्याच्या काळात महाराष्ट्र राज्य विविध बुवा आणि भोंदू यांच्या विळख्यात अडकत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. अशा परिस्थितीत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा व रुढी दूर करून शिक्षण, समता, बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला, याची आठवण उपस्थितांना करून देण्यात आली.
या कार्यक्रमाला जालिंदर माळी, विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपट खोसे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंचचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे समाजसेवक जयेश कांबळे, शरद भांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महापुरुषांचे विचार केवळ वाचनापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात अमलात आणणे हीच खरी आदरांजली आहे.” त्यांनी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.


