जामखेड प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील साकत गावचे भूमिपुत्र आणि ए.बी.एन. एक्सप्रेस न्यूजचे युवा, दमदार पत्रकार बापुसाहेब रावसाहेब घोडेस्वार यांना सन २०२६ चा राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक संस्था, केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अहिल्यानगर येथे करण्यात आले असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
गेल्या १३ वर्षांपासून बापुसाहेब घोडेस्वार यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष वृत्तांकन करत समाजातील तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. जिल्हा, तालुका तसेच ग्रामीण भागातील शैक्षणिक, सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचा प्रभावीपणे वापर केला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक संस्थेने त्यांची राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ यासाठी निवड केली आहे.
बापुसाहेब घोडेस्वार यांनी आपल्या कार्यातून जामखेड तालुक्याबरोबरच साकत गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा, तालुका आणि साकत पंचक्रोशीतील नागरिक, पत्रकार बांधव, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



