प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक : नवनाथ चव्हाण
दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील विद्यमान सरपंच राजवर्धन जगताप यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दौंड न्यायालयाने दिल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मारहाणीच्या गंभीर प्रकरणात तक्रार करूनही यवत पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करत संबंधित आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवून सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
धैर्यशील विजय शितोळे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जानुसार, २४ जून २०२५ रोजी रात्री देऊळगावगाडा येथील तिरुपती हॉटेल परिसरात काही जण चारचाकी वाहनातून आले. त्यांनी धैर्यशील शितोळे व योगिराज शितोळे यांच्यावर कुऱ्हाडी, लोखंडी गज, धारदार शस्त्रे आणि लाकडी काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून योगिराज शितोळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने टाके घालावे लागल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर यवत पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडेही पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यानंतरही कोणतीही दखल न घेतल्याने न्याय मिळविण्यासाठी तक्रारदाराला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.
दरम्यान, पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात दोघांना दुखापत झाल्याचे मान्य केले. मात्र, तक्रारदार पोलिस ठाण्यातून निघून गेला तसेच दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीची चर्चा सुरू असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे नमूद करण्यात आले.
मात्र, न्यायालयाने अर्ज, प्रतिज्ञापत्र, वैद्यकीय कागदपत्रे आणि पोलिसांचा अहवाल यांचा सखोल अभ्यास केला. उपलब्ध पुरावे पाहता प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा घडल्याचे स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण नोंदवत, या टप्प्यावर प्रकरणाच्या गुणवत्तेवर भाष्य न करता संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून निष्पक्ष व सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार यवत पोलिस ठाण्याला तत्काळ गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने वरिष्ठ अॅड. पी. डी. खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली अॅड. आसिफ शेख, अॅड. करण रणधीर, अॅड. पिंकू झेंडे आणि अॅड. विकी साळवे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तक्रारीतील आरोप गंभीर स्वरूपाचे असून उपलब्ध वैद्यकीय पुरावे आणि इतर कागदपत्रांच्या आधारे प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर ठामपणे मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या या आदेशामुळे यवत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणातील पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.



