करमाळा : दहिगाव उपसा सिंचन योजनेअंतर्गत पांडे, म्हसेवाडी तसेच परिसरातील नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, या भागाला तातडीने पाण्याचे आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी दहिगाव उपसा सिंचन संघर्ष समिती, पांडे यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसील कार्यालय तसेच पाटबंधारे विभाग, करमाळा येथे निवेदन देण्यात येणार आहे.
पांडे व म्हसेवाडी परिसरातील नागरिकांसाठी तसेच पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची असून, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी संघर्ष समितीने प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.
यामध्ये पांडे गावातील दोन्ही ओढ्यांमध्ये पाणी सोडून म्हसेवाडी तलाव भरण्यात यावा, पाण्याचे आवर्तन देताना ‘टेल टू हेड’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच म्हसेवाडी तलावाचा दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये कायमस्वरूपी समावेश करण्यात यावा, या मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री. जगदंबा देवी मंदिर येथे सर्व नागरिकांनी एकत्र जमावे, असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानंतर सर्वजण करमाळा येथे जाऊन तहसील कार्यालय व पाटबंधारे विभागाकडे निवेदन सादरणार आहेत.
पाणीप्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पांडे, म्हसेवाडी व परिसरातील नागरिक तसेच जनावरांसाठी आवश्यक पाण्याचे आवर्तन उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



