शेलगाव देशमुख ग्रामसभा २७ ऑगस्टला घेण्याचे पंचायत समितीचे निर्देश; २९ ऑगस्टची सभा रद्द करण्याचे आदेश

मेहकर : ग्रामपंचायत शेलगाव देशमुख येथे २० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर ग्रामसभेच्या नव्या तारखेवरून निर्माण झालेल्या वादावर पंचायत समिती मेहकर प्रशासनाने तोडगा काढला आहे. नागरिकांच्या निवेदनाचा विचार करून २९ ऑगस्ट २०२६ रोजी नियोजित केलेली ग्रामसभा रद्द करून २७ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा घेण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहेत.
पंचायत समिती मेहकरच्या पत्रानुसार, शेलगाव देशमुख येथे २० ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभा तहकूब करून ती २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा सभास्थळी करण्यात आली होती. त्यानंतर श्री. महेंद्र सदार व इतर नागरिकांनी पंचायत समितीकडे निवेदन साद करून २९ ऑगस्टऐवजी २५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्याची मागणी केली होती.
या प्रकरणी पंचायत समितीने ग्रामपंचायत प्रशासनाला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ७ नुसार नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, ग्रामसभेच्या तारखेबाबत नागरिकांनी पुन्हा आक्षेप नोंदविला. त्यानंतर झालेल्या चर्चेत २७ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यास निवेदनकर्ते, ग्रामस्थ तसेच तालुका सरपंच संघटनेचे सचिव यांनी सहमती दर्शविल्याचे पंचायत समितीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने ग्रामपंचायत प्रशासनाला २९ ऑगस्ट रोजी नियोजित केलेली ग्रामसभा रद्द करून २७ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा घेण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती कार्यालयास सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, शेलगाव देशमुख ग्रामपंचायतीमध्ये जल जीवन मिशन, पाणीटंचाई आणि स्वच्छता यांसारखे विषयही चर्चेत असल्याने संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी ग्रामसभेला उपस्थित राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा व बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले असून, स्वच्छ भारत मिशन कक्षालाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेकडे शेलगाव देशमुख ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, पाणीटंचाई, जल जीवन मिशन, स्वच्छता आणि गावातील इतर विकासकामांबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *