जि.प. प्रा. शाळा ढोकरीच्या कु. प्रांजल सलगर हिचे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांत घवघवीत यश

जेऊर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढोकरी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विद्यार्थिनी कु. प्रांजल नम्रता दिपक सलगर हिने विविध राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या आई-वडिलांचे, शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
कु. प्रांजल हिने राज्यस्तरीय एटीएस (ATS) परीक्षेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावून आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली आहे. तसेच राज्यस्तरीय बुद्धिवंत परीक्षेतही राज्यात तिसरा क्रमांक मिळवून दुहेरी यशाची नोंद केली आहे. याशिवाय मंथन परीक्षेत केंद्रस्तरावर द्वितीय क्रमांक, तर पीटीएस (PTS) परीक्षेत केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तिने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.
शालेय जीवनात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने सहभाग घेत कठोर परिश्रम, जिद्द आणि अभ्यासाच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे प्रांजलचे आई-वडील शेतकरी कुटुंबातील असून, मर्यादित साधनसामग्रीतून तिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्रांजलच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्हा परिषद शाळांबाबत पालकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील शासकीय शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण दिले जाते याची प्रचिती या यशातून आली आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्याचा विचार करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक पाथरूडकर सर, मेनकुदळे सर तसेच जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम महत्त्वाचे ठरले. त्यांनी प्रांजलचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कु. प्रांजल सलगर हिच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, शिक्षकवृंद तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून तिचे कौतुक करण्यात येत असून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामुळे ढोकरी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *