सोलापूर प्रतिनिधी |
सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे धडक देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ चे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिली.
धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः एसटी आरक्षणाच्या प्रश्नावर, मल्हार योद्धा दीपकजी बोराडे यांनी राजे मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी (१६ मार्च) पासून मुंबईतील आझाद मैदानावर अमर उपोषण सुरू केले आहे. सलग सहा दिवस उलटूनही शासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नसल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर “पिवळे वादळ” म्हणून ओळखली जाणारी धनगर समाजाची भव्य मोर्चा चळवळ २३ मार्च रोजी मुंबईत धडकणार आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने समाज बांधव मुंबईकडे रवाना होणार असल्याचेही सुपनवर यांनी स्पष्ट केले.
“अभी नहीं तो कभी नहीं” हीच वेळ असून, पक्ष-गट-तट बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेली सुमारे ७० वर्षे धनगर समाजाला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले असून त्यामुळे तीन पिढ्या प्रभावित झाल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.
ही लढाई ‘आरपारची’ असल्याचे सांगत, समाजाने वज्रमूठ करून एकदिलाने हक्कासाठी उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मल्हार योद्धा दीपक बोराडे यांच्या उपोषणाला बळ देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून प्रशासनानेही याकडे लक्ष दिले आहे.



