जामखेड (ता.प्रतिनिधी – अमृत कारंडे) :
जामखेड शहरात झालेल्या धक्कादायक गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जामखेडसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरातील न्युरानी कॉलनी परिसरात सागर मोहळकर हा जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. हल्लेखोरांनी गावठी कट्ट्याचा वापर करून एकूण सात गोळ्या झाडल्या, त्यापैकी पाच गोळ्या सागर मोहळकर याला लागल्या, तर दोन गोळ्या घटनास्थळी पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घटनेने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणी किसन चांगदेव मोहळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गु.र. नं. 122/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(1) तसेच आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव काळूबरमे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हा गुन्हा पूर्ववैमनस्यातून घडल्याची शक्यता वर्तवत पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात अभिमन्यु महादेव पोते (वय २४, रा. भुतवडा रोड, जामखेड) याला झिक्री गावच्या शिवारातून ताब्यात घेण्यात आले.
पोलीस चौकशीत अभिमन्यु पोते याने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे), रोहित विठ्ठल आखाडे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे) आणि ‘चिन्या’ (पूर्ण नाव अज्ञात, रा. कोथरुड, पुणे) या आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले असून ते सध्या फरार आहेत. जुन्या वादातून सागर मोहळकर याला जिवे मारण्याच्या उद्देशाने हे आरोपी जामखेड येथे आले होते. ४ मार्च रोजी सागर मोहळकरच्या हालचालींची माहिती आरोपींना देण्यात आली आणि त्यानंतर त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची कबुली पोते याने दिली आहे.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सागर मोहळकर याला प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
सागर मोहळकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. जामखेड शहर व परिसरात त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे मोठी दहशत पसरली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, गुन्हेगार तसेच पोलीस प्रशासनासाठी तो डोकेदुखी ठरत असल्याचे बोलले जात होते.
दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


