जामखेड प्रतिनधी अमृत कारंडे
१० ऑक्टोबर२०२५
जामखेड शहरातील कामगारांचे मोबाईल चोरणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जेरबंद झाले आहेत. सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील रांजणगाव रोड भागात १४ ते १५ सप्टेंबर दरम्यान घडलेल्या चोरीप्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी आकाश राजु साबळे यांच्या दुकानातून सुमारे ९५ हजार रुपयांचे विविध कंपन्यांचे मोबाईल चोरून नेले होते. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५१५/२०२५, भा.न्या.स. २०२३ च्या कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप मुरकुटे यांच्या पथकाने सखोल तपास करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे पथकाने जामखेड येथील बैलबाजारमधील पटांगण परिसरात छापा टाकला असता, आरोपी तुषार नितीन पवार (वय २०, रा. गोरोबा टॉकिजजवळ, जामखेड) व दिलीप किसन काळे (वय १८, रा. भुतोडारोड, जामखेड) हे संशयित आढळून आले.दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांनी प्राथमिक चौकशीत कबुली देत सांगितले की, त्यांनी जामखेड येथील सरकारी दवाखान्याच्या नवीन इमारतीत काम करणाऱ्या कामगारांचे मोबाईल चोरी केले होते. आरोपींच्या ताब्यातून तीन मोबाईल फोन, एकूण ४५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर आरोपींविरुद्धचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनमार्फत सुरू असून ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे, हृदय घोडके, बिरप्पा करमल, गणेश लबडे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व महिला पोलीस अंमलदार सारिका दरेकर यांनी केली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पार पडली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्याचे कौतुक होत आहे.