जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे /१०ऑक्टोबर२०२५
अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीप्रकरणी कारवाई करत 2.66 किलो गांजा, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 41,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष आदेशानुसार आणि अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
जामखेड शहरातील गोरोबा टॉकीजजवळ नितीन उर्फ कव्या धनसिंग पवार आणि त्याची पत्नी निशा नितीन पवार घरी गांजा विक्रीसाठी ठेवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या दोघांच्या घरावर छापा टाकून हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे, बिया आदी असलेला 2.66 किलो गांजा जप्त केला. तसेच रोख रक्कम व मोबाईल मिळवून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.कायदेशीर कारवाईयाप्रकरणी श्यामसुंदर जाधव यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 547/2025, एनडीपीएस (गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा 1985) कलम 8 (क), 20 (ब) ii (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनद्वारे सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या निरीक्षणाखाली; पोउपनि संदीप मुरकुटे, रमेश गांगर्डे, ह्रदय घोडके, बिरप्पा करमल, गणेश लबडे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, महिला पोलीस अंमलदार सारिका दरेकर यांसह संपूर्ण पथकाने केलेली आहे.ही कारवाई गांजा विक्री साखळीवर पोलिसांचा मोठा धक्का म्हणून पाहिली जात आहे.