उद्घाटन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जामखेड (प्रतिनिधी: बापूसाहेब घोडेस्वार)
जामखेड तालुक्यातील साकत येथे श्री साकेश्वर महाराज यात्रेनिमित्त ६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. जनाबाई रावसाहेब घोडेस्वार आणि रावसाहेब घोडेस्वार (आर.आर.) यांच्या सौजन्याने आयोजित या शिबिराला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री साकेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. दशरथ चौधरी यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या आरोग्य शिबिरात जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने १८ वर्षांवरील नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये डायबेटीस, हृदयविकार, हार्ट अटॅकचा धोका, कॅन्सर, संधिवात, किडनी विकार, थायरॉईड, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, रक्तातील चरबी, डोळ्यांचे आजार, ऍसिडिटी, मुतखडा, मूळव्याध तसेच महिला व पुरुषांच्या विविध आरोग्य समस्यांची तपासणी करण्यात आली. तसेच वजन कमी/वाढवण्याबाबत मार्गदर्शनही देण्यात आले.
या शिबिरासाठी पुणे येथील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. प्रवीण बढे यांच्या मार्गदर्शनाखालील वैद्यकीय पथक उपस्थित होते. डॉ. प्रवीण बढे हे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असून, त्यांच्या हॉस्पिटलच्या वतीने प्रथमच साकत येथे अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये डॉ. राजेंद्र बळे, डॉ. योगेश बोराडे, परमेश्वर भवर, विक्रम भवर यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी सहभागी झाले होते.
शिबिराचा लाभ प्रा. विकी घायतडक, डॉ. भगवान मुरूमकर, संजय वराट, कैलास वराट यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी घेतला. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासणी होत असल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली.
या कार्यक्रमाला नगरसेवक प्रा. विकी घायतडक, माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवान मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलास वराट, युवा नेते कबीर घायतडक, पोलीस पाटील महादेव वराट, तसेच विविध गावांतील ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक भाऊसाहेब रावसाहेब घोडेस्वार (PMPML, पुणे) व पत्रकार बापूसाहेब रावसाहेब घोडेस्वार (भावी सरपंच, साकत) होते, तर संयोजक म्हणून युवा नेते निशांत भैय्या तुपेरे यांनी पुढाकार घेतला.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले, “लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होतो. हे शिबिर साकत ग्रामस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.”
या उपक्रमामुळे साकत परिसरात समाधानाचे वातावरण असून, भविष्यातही अशा आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



