पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या घरावर चोरट्याचा डल्ला; गावात भीतीचे वातावरण

देऊळगाव साखरशा (प्रतिनिधी): दशरथ गायकवाड
देऊळगाव साखरशा येथे भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच ‘विदर्भ मतदार’चे संपादक प्रमोद बापू देशमुख यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे साडेसहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
ही घटना २४ मार्च रोजी दुपारी १.४५ ते सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्याने घराच्या पोर्चमध्ये ठेवलेल्या पलंगावरील गादीखाली लपवून ठेवलेली चावी मिळवली. त्यानंतर दरवाजाचे लॉक उघडून तो घरात शिरला.
घरातील बेडरूममधील लाकडी अलमारीत ठेवलेल्या दागिन्यांच्या बॉक्समधून वडिलोपार्जित तसेच विकत घेतलेले एकूण २५ तोळे २ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. या दागिन्यांची अंदाजे किंमत ६ लाख ४५ हजार ७० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी प्रमोद दादाराव देशमुख (वय ६०) यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात कलम ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आजिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, हेड कॉन्स्टेबल अतुल पवार व कॉन्स्टेबल अमोल अंभोरे करत आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही.
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे देऊळगाव साखरशा व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *