सहा विद्यार्थी पात्र; तीन विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत समावेश
करमाळा प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत करमाळा तालुक्यातील पोफळज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हाणेवस्तीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील तब्बल सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले असून, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळविला आहे.
जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सभ्यवी नवनाथ शेंडगे (२४२ गुण), वर्धन सोमनाथ गव्हाणे (२३२ गुण) आणि गौरव बाळू लगड (२३० गुण) यांचा समावेश आहे.
तर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या अन्य विद्यार्थ्यांमध्ये प्रद्युम्न प्रशांत लबडे (२०८ गुण), दिविजा राहुल गोडगे (१९६ गुण) आणि आदित्य बाबुराव सरकाळे (१५० गुण) यांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत तसेच पालक व ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री. सतीश उत्तम चिंदे आणि मुख्याध्यापक श्री. अनिल दिनकर कुलकर्णी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नियमित सराव, योग्य नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नानासाहेब शिंदे, उपाध्यक्ष श्री. बबन सरकाळे, पोफळज गावचे सरपंच श्री. कल्याणराव पवार, उपसरपंच श्री. बिभिशन गव्हाणे, आदिनाथ कारखान्याचे संचालक श्री. दत्तात्रय गव्हाणे, शिक्षणतज्ज्ञ श्री. पांडुरंग शिंदे, केंद्रप्रमुख श्री. सुहास गुळवे, माजी केंद्रप्रमुख श्रीमती वंदना पांडव, विस्ताराधिकारी श्री. जयवंत नलवडे, गटशिक्षण अधिकारी श्री. नितीन कदम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि स्पर्धात्मक परीक्षांची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे, हे या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
“गुणवत्तेच्या बाबतीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हाणेवस्ती यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहील,” अशी ग्वाही मुख्याध्यापक श्री. अनिल कुलकर्णी यांनी दिली.



