भिमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे दि.22 : सोमवारपासून श्रावण महिना सुरु होत असून श्रावणी महिन्यात होणारी गर्दी व विविध सुविधा यांचा विचार करून प्रशासन व मंदिर समितीने अधिकृत संकेत स्थळ स्थापन करुन श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी सुविधा तात्काळ मिळतील अशी व्यवस्था करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालया येथे श्रावणी सोमवार यात्रा नियोजन बाबत आढावा बैठक, जिल्हाधिकारी श्री.डुडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, प्रशासकीय व्यवस्थापक प्रमोद शिर्के, सह-कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, खेडचे तहसिलदार प्रशांत बेद्रे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक व अन्य विभागाचे संबधीत अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र भीमाशंकरला श्रावण महिन्यात येत्या सोमवारपासून दर्शनासाठी येणाऱ्या भावीकांची मोठी गर्दी लक्षात घेता एक रांग व्ही.आय.पी. दर्शन व दुसरी साधी दर्शन रांग अशा दोन रांगेत दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करावी. तसेच दर्शन, पुजा करण्यासाठी निश्चित टप्पा तयार करावे. वाहनतळाची ठिकाणे पोलिस विभागाने निश्चित करुन त्या ठिकाणी चार्जिगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. वन विभागानेही पाहणी करुन रस्त्यातील अडथळे दुर करावेत. भाविकांची गैरसोय होवू नये व त्यांना चांगल्या सुविधा देता याव्यात. यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करुन दक्ष राहण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

या कामास प्राधन्य देवून येत्या रविवार पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत. तसेच मंदिर परिसर, भिमाशंकर गाव, मंचर या ठिकाणी क्यूआर कोड बाबत माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. क्यूआर कोडच्या माध्यमातून व्ही.आय.पी. दर्शन सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच क्यूआर कोडद्वारे मंदीर संस्थानमार्फत भाविकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती उपलब्ध होईल त्या दृष्टीने व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *