जामखेड प्रतिनिधी | अमृत कारंडे
जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात तीव्र उन्हामुळे उष्माघाताच्या घटना वाढत असताना शनिवारी (दि. २ मे २०२६) एक धक्कादायक घटना घडली. खर्डा-भूम रोडवर एका वृद्ध महिलेची तब्येत अचानक बिघडली; मात्र स्थानिक पत्रकार श्वेता गायकवाड आणि डॉ. लाड यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे त्या वृद्धेचा जीव वाचला.
जामखेड तालुक्यातील साकत येथील सरुबाई पूलवळे (वय ७०) या आपल्या मुलासोबत दुचाकीवरून भूम तालुक्यातील वरूड येथून साकतकडे परत येत होत्या. दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास कडाक्याच्या उन्हात खर्डा-भूम रोडवरील किल्ला परिसरात त्यांना अचानक चक्कर आली. त्या रस्त्यावर पडल्या व त्यांना उलट्या होऊ लागल्या. काही क्षण त्या बेशुद्धही झाल्या.
ही घटना लक्षात येताच पत्रकार श्वेता गायकवाड यांनी तात्काळ परिस्थितीचा अंदाज घेत डॉ. लाड यांना संपर्क साधला आणि ॲम्बुलन्सची व्यवस्था केली. डॉक्टर घटनास्थळी तत्काळ पोहोचले व सरुबाई यांची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. त्यांना लिंबूपाणी देण्यात आले व उष्माघात झाल्याचे निदान करण्यात आले. योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर झाली.
डॉक्टरांचे नागरिकांना आवाहन
यावेळी डॉ. लाड यांनी नागरिकांना इशारा देत सांगितले की, “उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या, शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळा आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडावे. हलक्या व सैल कपड्यांचा वापर करावा.”
या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी पत्रकार श्वेता गायकवाड आणि डॉक्टर लाड यांच्या तत्परतेचे कौतुक केले. त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे एक जीव वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने उष्माघाताबाबत जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



