करमाळा प्रतिनिधी:
करमाळा तालुक्यातील धगटवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षा पूजा शिवाजीराव शेळके व सुनिता भाऊराव जाधव यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती Savitribai Phule यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देशमाने सर यांनी प्रास्ताविक करत जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले तसेच कार्यक्रम पत्रिकेचे वाचन केले. उपक्रमशील शिक्षक गोकुळ मच्छिंद्र कोकाटे सर यांनी भारतातील विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती देत महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची, लंगडी, फुगडी, उखाणे सांगणे तसेच पतीसोबत बकेटमध्ये चेंडू टाकण्याचा खेळ अशा अनेक खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या खेळांमुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला पुनम पाडुळे, मोनाली धगाटे, राणी पाडुळे, रुपाली धगाटे, आकांक्षा पाडुळे, निकिता धगाटे, सोनाली शिंदे, मनिषा दरेकर, मनिषा धगाटे, रेश्मा धगाटे यांसह बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी रंगपंचमीचा आनंदही लुटला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका मनिषा दरेकर मॅडम व अंगणवाडी मदतनीस मनिषा धगाटे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेतील विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेत आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी गोकुळ मच्छिंद्र कोकाटे सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
– समशेर पठाण
जिल्हा प्रतिनिधी, ABN Express News, सोलापूर



