साखर कारखान्याने उसाचे बिल तात्काळ द्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन – अण्णासाहेब सुपनवर

करमाळा प्रतिनिधी:

कमलाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे थकीत बिल तात्काळ अदा करावे, अन्यथा पुढील चार ते पाच दिवसांत कारखान्याच्या स्थळावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला आहे.
सुपनवर यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात गाळप केलेल्या उसाचे बिल अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. उसाचे गाळप होऊन तब्बल चार ते पाच महिने उलटून गेले तरी कमलाई सहकारी साखर कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांचे पैसे देण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून उसासाठी रासायनिक खत, खुरपणी व बांधणी यासाठी मोठा खर्च येत आहे. मात्र, उसाचे बिल न मिळाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. इतर बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाची बिले जमा केली आहेत; परंतु कमलाई साखर कारखाना मात्र शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उसाचे पैसे न मिळाल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांना खत व बियाणे उधारीवर देण्यास तयार नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना सावकारांकडून व्याजाने पैसे घेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे कमलाई साखर कारखान्याच्या प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाचे पैसे जमा करावेत, अशी मागणी सुपनवर यांनी केली.
चार ते पाच दिवसांत उसाचे बिल मिळाले नाही तर कारखान्याच्या साइटवर शेतकऱ्यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यायावेळी महेंद्र शिंदे, विनोद महानवर, सचिन शिंदे, रामा शिंदे, नवनाथ शिंदे, नाथाभाऊ नरुटे, परमेश्वर कांबळे, विजय हाके, बाळू हाके यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *