जामखेड प्रतिनिधी : अमृत कारंडे.
जैवविविधता संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे फक्राबाद तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील जैवविविधता संशोधक व युवा शास्त्रज्ञ रणजित रावसाहेब राऊत यांचा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते मानाचा फेटा, शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
हा सत्कार कार्यक्रम कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. रणजित रावसाहेब राऊत यांनी मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध भागात जैवविविधतेचा अभ्यास, वन्यजीवांचे संवर्धन, तसेच ग्रामीण भागातील तरुणांना पर्यावरण विषयक जागृती घडविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या “जैवविविधता संरक्षण व संवर्धन”, “पर्यावरण जन जागरूकता”, मानव–वन्यजीव संघर्ष जागरूकता”, “औषधी वनस्पतींचे संवर्धन”, तसेच “फुलपाखरू विविधतेचा अभ्यास” या संशोधन उपक्रमांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला आहे.
या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातून असे युवा शास्त्रज्ञ पुढे येणे ही अभिमानाची बाब आहे. रणजित राऊत यांचे कार्य प्रेरणादायी असून अशा तरुणांनीच पुढील पिढ्यांना निसर्ग संवर्धनाचे भान दिले पाहिजे.
कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंच माहिजळगाव चे अध्यक्ष नवनाथ शिंदे, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराबद्दल बोलताना रणजित राऊत यांनी सांगितले, *“हा सन्मान माझ्या कार्याची प्रेरणा असून पुढील काळात ग्रामीण भागात जैवविविधता संरक्षण व संवर्धन, औषधी वनस्पती संवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी अधिक व्यापक पातळीवर काम करण्याचा माझा संकल्प आहे.”
हा सत्कार कार्यक्रम समाजातील युवा संशोधकांना प्रेरणा देणारा ठरला.



