निसर्गाच्या परिपूर्णतेसाठी गिधाडांचे महत्त्वगिधाडांचे संरक्षण व संवर्धन : काळाची गरज रणजित राऊत यांचे मत

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे.

दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी “आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिन” साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये गिधाडांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे व त्यांच्या अस्तित्वाच्या संकटांची माहिती देणे. गिधाडांचा नाश होणे हे परिसंस्थेतील संतुलन बिघडण्याचे संकेत आहे, ज्यामुळे मानवाच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो म्हणुन गिधाडांचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत युवा शास्त्रज्ञ, जैवविविधता संशोधक
रणजित राऊत यांनी व्यक्त केले. ते सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई, येथे प्राणीशास्त्र विभागात पीएच. डी. चे विद्यार्थी म्हणून कार्यरत आहेत.

गिधाड म्हणजे निसर्गाची स्वच्छता राखणारे अति महत्वाचे पक्षी. आपण त्यांच्या कर्तव्याला कदाचित फार महत्त्व देत नाही, पण गिधाडे आपल्या परिसंस्थेचा अत्यावश्यक घटक आहेत. गिधाडे मृत प्राण्यांचे मांस खाऊन निसर्गाची स्वच्छता राखतात, त्यामुळे अनेक प्रकारचे रोग आणि जीवाणूंचा प्रसार थांबतो. त्यांच्या अनुपस्थितीत, मृत प्राण्यांच्या अवशेषांमुळे रोगराई पसरून मानव आणि प्राण्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

गिधाडांची घटती संख्या – एक गंभीर समस्या
गेल्या काही दशकांमध्ये भारतातील गिधाडांची संख्या चिंताजनक पद्धतीने घटली आहे. १९९०च्या दशकात गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, परंतु आज त्यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. या घटनेचे प्रमुख कारण म्हणजे “डायक्लोफेनॅक” नावाचे औषध, जे पशूंच्या उपचारासाठी वापरले जाते. हे औषध गिधाडांच्या शरीरात जाऊन त्यांचे मूत्रपिंड निकामी करते आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते.

गिधाडांच्या संरक्षणासाठी उचललेली पावले

गिधाडांच्या संरक्षणासाठी विविध संस्था आणि सरकारे पुढाकार घेत आहेत. गिधाड सुरक्षित क्षेत्र आणि गिधाड पुनर्वसन केंद्रे उभारून त्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना डायक्लोफेनॅक च्या वापराबाबत जागरूक केले जात आहे आणि त्याऐवजी सुरक्षित औषधांचा वापर करण्याचे आवाहन केले जाते.

गिधाडे टिकवण्यासाठी आपल्या हातात काय आहे?
गिधाडांच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे:

  1. गिधाडांच्या संवर्धनासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या संस्थांना मदत करुन आपण गिधाडांच्या संवर्धनासाठी मदत करू शकतो.
  2. शेतकरी आणि पशुपालकांमध्ये डायक्लोफेनॅक औषधाविषयी जागरूकता निर्माण करने गरजेचे आहे.
  3. आपल्या परिसरात गिधाडांच्या सुरक्षित अधिवासासाठी आवश्यक पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
  4. पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून गिधाडांचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवने गरजेचे आहे.

गिधाडांचे अस्तित्व निसर्गाच्या परिसंस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिन हे एक चांगले व्यासपीठ आहे, जिथे आपण सर्वजण एकत्र येऊन गिधाडांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलू शकतो. त्यांच्या अस्तित्वामुळे निसर्गातील आरोग्य टिकून राहील आणि मानवासह सर्व प्राणिमात्रांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान होईल.

गिधाडे वाचवा, निसर्ग वाचवा!

लेखक:
रणजित राऊत, युवा शास्त्रज्ञ, निसर्ग अभ्यासक, जैवविविधता संशोधक आहेत, ते सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई, येथे प्राणीशास्त्र विभागात पीएच. डी. चे विद्यार्थी म्हणून कार्यरत आहेत.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *