धक्कादायक ! “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार ; आपत्य झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ;

 आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी – अमृत कारंडे

१८ सप्टेंबर २०२५

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे खर्डा शहरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही मातंग समाजातील असून, आरोपी नाना श्रीहरी भोसले (रा. मुंगेवाडी, ता. जामखेड) याने जुलै २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून खर्डा गावाजवळील जंगलात नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही आरोपीने पखरुड (ता. भुम, जि. धाराशिव) येथे वेळोवेळी फिर्यादीसोबत असेच कृत्य केले. या प्रकारामुळे फिर्यादी गर्भवती राहिली व ५ एप्रिल २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र, मुलगी झाल्यावर आरोपीने फिर्यादी व तिच्या मुलीची जबाबदारी घेण्यास नकार दिला. अखेर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून खर्डा पोलिसांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा आरोपीविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(M), ६९, तसेच अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(२)(va), ३(१)(w)(i)(ii) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. उज्वलसिंग राजपूत करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक झाली नसून, तपास पुढे चालू आहे.
सदर प्रकरण गंभीर असून, आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी व तपास सखोलपणे करण्यात यावा, अशी मागणी पुणे जिल्हा मानवहित लोकशाही पक्षाचे अध्यक्ष अनिल भाऊ कांबळे यांनी केली आहे.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *