करमाळा प्रतिनिधी:
अण्णासाहेब सुपनवर (भाजप किसान मोर्चा, सोलापूर जिल्हा सरचिटणीस) यांनी केळी आणि कांदा पिकांना किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात आणखी अडकतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
भाजप किसान मोर्चा च्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या वाढत्या खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. केळी पिकासाठी एकरी सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च येत असल्याचे सांगण्यात आले. रासायनिक खतांचे दर वाढल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सध्या व्यापारी शेतकऱ्यांकडून केळी केवळ चार ते पाच रुपये किलो दराने घेत आहेत. मात्र हीच केळी पुढे बाजारात ग्राहकांना 40 ते 50 रुपये डझन दराने विकली जात असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कमी दराने माल खरेदी करून जास्त दराने विक्री केली जात असल्याने व्यापाऱ्यांचा नफा वाढत असताना शेतकरी मात्र तोट्यात जात आहेत.
कांदा पिकाची परिस्थितीही तितकीच गंभीर असल्याचे सांगण्यात आले. लागवड, खुरपणी, मजुरी आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे कांदा उत्पादनासाठी एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च होत आहे. मात्र सध्या बाजारात कांद्याला केवळ पाच ते सहा रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना नफा मिळणे तर दूरच, उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक तणावाखाली असून केळी उत्पादकांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचावे लागत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी चालू अधिवेशनात केळी व कांदा या दोन्ही पिकांसाठी हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राज्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल होऊन आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया अण्णासाहेब सुपनवर यांनी व्यक्त केली.



