जामखेड प्रतिनिधी – अमृत कारंडे.
जामखेड तालुक्यातील खर्डा मोहरी गावात बिबट्याने हल्ला करून सुखदेव श्रीरामे यांच्या बैलाचा बळी घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून खर्डा परिसरातील डोंगराळ भागात बिबट्यांची हालचाल वाढली आहे. ग्रामस्थांनी या भागाला बिबट प्रवण क्षेत्र घोषित करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.सुखदेव श्रीरामे यांनी रात्री आपल्या गोठ्यात बैल बांधला असता, बिबट्याने अचानक हल्ला करून तो ठार केला. सकाळी घटना उघडकीस येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आकाश श्रीरामे, संजय श्रीरामे, धोंडीबा तोंडे, सौरभ तोंडे, सुजीत तोंडे, बाळू तोंडे, दिगंबर हळनावर आदी उपस्थित होते.सध्या रब्बी हंगाम सुरु असून शेतकरी रात्री शेताला पाणी देण्यासाठी आणि जनावरांची देखभाल करण्यासाठी शेतात जातात. परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व महिलांना रात्री शेतात जाण्याची भीती वाटू लागली आहे. महिलांना ज्वारी खुरपणीसाठी एकत्रितपणे शेतात जावे लागत आहे.ग्रामस्थांनी बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावावेत व ग्रामपातळीवर गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. वन विभागाने या घटनेची दखल घेत तात्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



