जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जामखेड तालुक्यात मार्च २०२६ अखेर कर्ज वसुलीचा दर ५१.४३ टक्क्यांवर पोहोचला असून, तालुक्यातील ठेवींमध्येही लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही शेतकरी सभासदांनी कर्जफेडीत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आशिया खंडातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. ही ओळख अधिक मजबूत करण्यासाठी बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील, व्हाइस चेअरमन तसेच संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे राळेभात यांनी नमूद केले. खातेदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवींनी ११,३११ कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा पार केला आहे.
बँकेकडून सोनेतारण कर्ज योजनेत सुधारणा करण्यात आली असून, प्रतिव्यक्ती कर्ज मर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच ८ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. जामखेड तालुक्यातील पाच शाखांमध्ये ही सुविधा सुरू असून अरणगाव शाखेत नव्याने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
डिजिटल सेवांमध्येही जिल्हा बँक आघाडीवर असून, फोन पे, गुगल पे आणि मोबाइल बँकिंगसारख्या सुविधांनंतर लवकरच व्यावसायिकांसाठी बारकोड (QR कोड) सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या नियमांनुसार बँकेचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचेही राळेभात यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत, १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या मोहा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा विशेष गौरव करण्यात आला. संस्थेचे चेअरमन महादेव देडे व सचिव दीपक नेटके यांचा जिल्हा बँकेच्या लोकनेते जगन्नाथ राळेभात पाटील सभागृहात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास मार्केट कमिटी संचालक विठ्ठल चव्हाण, गजानन शिंदे, जामखेड संस्थेचे चेअरमन अंकुश कोल्हे, तालुका सचिव नितीन सपकाळ, तालुका विकास अधिकारी दरगुडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.



